• Kothrud, Pune, Maharashtra
  • Call: +(91) 935 954 5582

इन्सुलिन शाप की वरदान

इन्सुलिन या संप्रेरकाचा शोध लागल्याला नुकतेच एक शतक पूर्ण झाले. यानिमित्ताने इन्सुलिन बद्दलचे समज-गैरसमज समजून घेण्याच्या उद्देशाने या महत्त्वाच्या पण बहुतेक मधुमेही रुग्णांच्या मनात ब्रह्मराक्षस म्हणून भीती घालणाऱ्या ‘इन्सुलिन’ या संप्रेरकावर माहिती देणारा हा लेख सादर करीत आहोत.

इन्सुलिन एक संप्रेरक

इन्सुलिन हे मानवी  शरीरातील स्वादुपिंडातुन तयार होणारे एक संप्रेरक आहे. अन्नातून घेतल्या जाणाऱ्या पिष्टमय पदार्थांचे रुपांतर ऊर्जेत करणे तसेच अतिरिक्त सेवन केलेल्या अन्नाचे साठवून ठेवण्यासाठी मेदात रूपांतर करणे हे इन्सुलिनचे मूळ काम आहे. शरीरात हे इन्सुलिन थोड्या प्रमाणात सतत तयार होत असते व शरीरातील साखरेची पातळी उपाशीपोटी देखील 80 ते 120 mg/dl इतकी सांभाळली जाते. बहुतेक अन्न पदार्थांच्या सेवनानंतर विशेषतः पिष्टमय पदार्थांच्या सेवनानंतर शरीरात इन्सुलिन अधिक प्रमाणात तयार होऊन जेवणानंतरची साखर साधारणतः 140 ते 160 mg/dl या पातळीवर सांभाळली जाते. इन्सुलिनच्या अगदी विरुद्ध स्वरूपाचे काम करणारे ‘ग्लूकागॉन’ नावाचे संप्रेरक देखील या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते.

इन्सुलिन आणि मधुमेहाची वर्गीकरण

वरील माहितीवरून आपल्या हे लक्षात आलेच असेल की इन्सुलिन आणि मधुमेह यांचा किती घनिष्ट संबंध आहे. इन्सुलिन शरीरात तयार न होणे अथवा तयार झालेल्या इन्सुलिनचे काम व्यवस्थित न होणे या दोन कारणांवर आधारीत मधुमेहाचे सर्वसाधारण वर्गीकरण करतात. ढोबळ मानाने शरीरात अजिबात इन्सुलिन तयार होत नसेल  तर त्या मधुमेहाच्या रुग्णांना ‘type 1’ असे म्हणतात तर मुख्यत्वे ज्यांच्या शरीरात इन्सुलिनचे काम व्यवस्थित होत नाही अशा मधुमेहाच्या रुग्णांना ‘type 2’ असे म्हणतात. बऱ्याचदा इन्सुलिनची पूर्ण कमतरता नसून  पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार न होणे असेही  काही रुग्णांमध्ये आढळून येते. या दोन महत्त्वाच्या वर्गीकरणाशिवायही मधुमेहाचे अजून प्रकार आहेत परंतु जवळजवळ 95% रुग्ण यापैकी एका वर्गात मोडतात. 

 इन्सुलिन आणि मधुमेहाचा इलाज

सहाजिकच ज्या रुग्णांच्या शरीरात इन्सुलिन अजिबात तयार होत नाही अशा रुग्णांना इन्सुलिनच्या इंजेक्शनच्या स्वरुपात जीवनदान मिळाले आहे असेच समजावे. इन्सुलिनच्या शोधाआधी असे रुग्ण खूप लहान वयात मृत्युमुखी पडत असे. Type 2 मधुमेह व इतर काही प्रकारच्या मधुमेही रूग्णांमध्ये  देखील इन्शुलिन तयार करण्याची क्षमता काही वर्षांनी कमी होत जाऊन बाहेरून इन्सुलिन देण्याची गरज पडू शकते. काही वेळा वजन जास्त असलेल्या पेशंटमध्ये जीवनशैलीत बदल करून इन्सुलिनचे प्रमाण आणि परिणाम वाढवून मधुमेहाला औषधांशिवाय बरे करता येऊ शकते. परंतु अशा रुग्णांची योग्य निवड करणे आवश्यक असते. व्यवस्थित पद्धतीने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इन्सुलिनचा वापर धोकादायक ठरू शकतो.

थोडक्यात

इन्सुलिन हे शरीराच्या ऊर्जानिर्मिती निर्मितीच्या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचे संपर्क आहे. त्याच्या कमतरतेमुळे अथवा व्यवस्थित काम न करणे यामुळे मधुमेह होतो. जीवनशैलीमध्ये सुधारणा केल्याने काही प्रमाणात इन्शुलिनचे शरीरातील कार्य सुधारू शकते. परंतु जर शरीरातील इन्शुलिन तयार होत नसेल तर बाहेरून दिले जाणारे इन्सुलिन जीवनदायी ठरते. 

डॉअंजली भट्ट

संपर्क –  93 59 54 55 82

Leave a Reply

Your email address will not be published.

You may use these <abbr title="HyperText Markup Language">HTML</abbr> tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

*

Hi, How Can We Help You?