इन्सुलिन या संप्रेरकाचा शोध लागल्याला नुकतेच एक शतक पूर्ण झाले. यानिमित्ताने इन्सुलिन बद्दलचे समज-गैरसमज समजून घेण्याच्या उद्देशाने या महत्त्वाच्या पण बहुतेक मधुमेही रुग्णांच्या मनात ब्रह्मराक्षस म्हणून भीती घालणाऱ्या ‘इन्सुलिन’ या संप्रेरकावर माहिती देणारा हा लेख सादर करीत आहोत.
इन्सुलिन हे मानवी शरीरातील स्वादुपिंडातून तयार होणारे एक संप्रेरक आहे. अन्नातून घेतल्या जाणाऱ्या पिष्टमय पदार्थांचे रुपांतर ऊर्जेत करणे तसेच अतिरिक्त सेवन केलेल्या अन्नाचे साठवून ठेवण्यासाठी मेदात रूपांतर करणे हे इन्सुलिनचे मूळ काम आहे.
शरीरात हे इन्सुलिन थोड्या प्रमाणात सतत तयार होत असते व शरीरातील साखरेची पातळी उपाशीपोटी देखील 80 ते 120 mg/dl इतकी सांभाळली जाते. बहुतेक अन्न पदार्थांच्या सेवनानंतर विशेषतः पिष्टमय पदार्थांच्या सेवनानंतर शरीरात इन्सुलिन अधिक प्रमाणात तयार होऊन जेवणानंतरची साखर साधारणतः 140 ते 160 mg/dl या पातळीवर सांभाळली जाते.
इन्सुलिनच्या अगदी विरुद्ध स्वरूपाचे काम करणारे ‘ग्लूकागॉन’ नावाचे संप्रेरक देखील या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते.
इन्सुलिन आणि मधुमेह यांचा घनिष्ट संबंध आहे. इन्सुलिन शरीरात तयार न होणे अथवा तयार झालेल्या इन्सुलिनचे काम व्यवस्थित न होणे या दोन कारणांवर आधारित मधुमेहाचे वर्गीकरण केले जाते.
शरीरात अजिबात इन्सुलिन तयार होत नसेल तर त्या मधुमेहाच्या रुग्णांना ‘Type 1’ असे म्हणतात. ज्यांच्या शरीरात इन्सुलिनचे काम व्यवस्थित होत नाही अशा रुग्णांना ‘Type 2’ असे म्हणतात. जवळजवळ 95% रुग्ण यापैकी एका वर्गात मोडतात.
ज्या रुग्णांच्या शरीरात इन्सुलिन अजिबात तयार होत नाही अशा रुग्णांना इन्सुलिनच्या इंजेक्शनच्या स्वरूपात जीवनदान मिळाले आहे असेच समजावे. इन्सुलिनच्या शोधाआधी असे रुग्ण लहान वयात मृत्युमुखी पडत असत.
Type 2 मधुमेहामध्ये काही वर्षांनी इन्सुलिन तयार करण्याची क्षमता कमी होत जाऊन बाहेरून इन्सुलिन देण्याची गरज पडू शकते. काही वेळा जीवनशैलीत बदल करून मधुमेह औषधांशिवाय नियंत्रणात आणता येतो, परंतु योग्य रुग्णांची निवड आवश्यक असते.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इन्सुलिनचा वापर धोकादायक ठरू शकतो.
इन्सुलिन हे शरीराच्या ऊर्जानिर्मिती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे संप्रेरक आहे. त्याच्या कमतरतेमुळे किंवा व्यवस्थित काम न केल्यामुळे मधुमेह होतो. जीवनशैलीत सुधारणा केल्याने काही प्रमाणात फायदा होऊ शकतो, परंतु इन्सुलिन तयार होत नसेल तर बाहेरून दिले जाणारे इन्सुलिन जीवनदायी ठरते.
डॉ. अंजली भट्ट
संपर्क – 93 59 54 55 82